येथील मराठा सेवा संघप्रणीत जगद्गुरू तुकोबाराय साहित्य परिषदेतर्फे रविवारी सहाव्या मराठा साहित्य संमेलनाचे उद्घाटन क्रांती वीरांगना कॅप्टन लीला पाटील साहित्यनगरीत डॉ. गेल ऑमवेट (नवी दिल्ली) यांच्या हस्ते झाले. त्या वेळी अध्यक्षीय भाषणात प्रा. कडू बोलत होते. कष्टकरी शेतकऱ्यांच्या प्रतीकात्मक नांगरावर पुष्प उधळून जिजाऊंच्या जय जयकारात उद्घाटन झाले. या वेळी लॅपटॉप, लेखणी ठेवण्यात आली.
मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष इंजिनिअर व ऍड. पुरुषोत्तम खेडेकर, खासदार ए. टी. पाटील, महापालिकेचे आयुक्त रामनाथ सोनवणे, आमदार संजय सावकारे, परिषदेचे महाराष्ट्र अध्यक्ष डॉ. साहेब खंदारे, सौ. शैल जैमिनी, जिजाऊ ब्रिगेडच्या प्रदेशाध्यक्षा सीमा ढवळे, मराठा सेवा संघाचे महाराष्ट्र अध्यक्ष इंजिनिअर नेताजी गोरे, ब्रिगेडिअर सुधीर सावंत, "शिवधर्मा'चे देवानंद कापसे, शिक्षक परिषदेचे प्रदेशाध्यक्ष पप्पू पाटील- भोयर, संघाचे प्रदेश सचिव विजयकुमार ढुगे, परिषदेचे महाराष्ट्र सचिव प्रा. दिलीप चौधरी, परिषदेचे जिल्हाध्यक्ष सुरेंद्र पाटील व्यासपीठावर होते.
प्रा. कडू म्हणाले, की महाराष्ट्र स्थापनेनंतर शिक्षणाची धोरणे तयार करण्याची जबाबदारी बहुजनांना कमी लेखणाऱ्यांच्या हातात गेली. त्यांनी बहुजनांना कमी लेखून बहुजनांचा विकास न होता, ते आपल्याच आधिपत्याखाली कसे राहतील याचा विचार केला. त्याचे वास्तव चित्र समाजासमोर येऊ दिले नाही. यामुळे आज सांस्कृतिक विचारांची दरी निर्माण झाली. त्यास आपण सर्व दोषी आहोत. छत्रपती शिवाजी महाराजांबरोबर महात्मा जोतिबा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव घेतो, तेव्हा आजची पिढी शिवाजी महाराजांचे नाव ठीक आहे. मात्र, इतरांचे काय, असा प्रश्न करतात. या विचारांच्या दरीला शैक्षणिक धोरण जबाबदार आहे. बाराखडीतला "भ' भटजीचाच का शिकविला गेला, भोवऱ्याचा का नाही?, "ग' गणपतीचा का शिकविला गेला, गवताचा का नाही?
ते म्हणाले, की सर्व महापुरुषांचे विचार आपण समजून घेतले, तरच जीवन कळणार आहे. पाच हजार वर्षांपासून जो माणूस आहे, त्याला सामाजिक प्रतिष्ठा त्याला नाही. ती प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी आमची धडपड आहे. शोषणाचा विरोध व समतेची स्थापना, हे आमचे ध्येय आहे. भगवान गौतम बुद्धांनी मनाचा विचार करून धम्म सांगितला.
मराठा साहित्य समजून घ्यावे
मराठी भाषा ही मुळात मराठा भाषा आहे. भाषा हा शब्द स्त्रीलिंगी असल्याने "मराठा भाषा' असे संबोधिले जात नाही. मराठा- मराठी हे शब्द जात-वाचक नसून, ते भाषावाचक, प्रांतवाचक आहेत. आम्हाला आमचे अस्तित्व निर्माण करायचे आहे. आमचा माणूस आम्हाला मोठा करायचा आहे. जोपर्यंत ही भावना आपल्यात भिनत नाही, तोपर्यंत ब्राह्मणवाद्यांचा विजय होणारच आहे. आजची युवापिढी व आपल्यात असलेली सांस्कृतिक दरी कमी करून समाजाला वाचवायचे असेल, तर मराठा साहित्य हे समजून घेतले पाहिजे. आमच्यात न्यूनगंडाची भावना आहे, ती काढून टाकली पाहिजे. समतावादी- समन्वयवादी धोरणाची अपेक्षा आहे. आम्ही जी भूमिका घेऊन कार्यरत झालो आहोत, त्याचे परिणाम दिसू लागले आहेत. मराठा साहित्यिकांनी, लेखकांनी याबदलाकडे अधिक परिणामकारक रीतीने पाहिले पाहिजे.
या वेळी उद्घाटक डॉ. ऑमवेट, परिषदेचे राज्याध्यक्ष डॉ. खंदारे, मराठा सेवा संघाचे अध्यक्ष गोरे, आयुक्त सोनवणे आदींनी मनोगत व्यक्त केले. प्रा. लीलाधर पाटील, रामचंद्र पाटील यांनी सूत्रसंचालन केले. साहित्यिक जयसिंग वाघ यांनी परिचय करून दिला.