मराठा साहित्य हेच मुळात मराठी साहित्य- जैमिनी कडू |
मराठा साहित्य हेच मुळात मराठी साहित्य आहे, तसेच मराठी ही भाषा मुळात मराठा असून भाषा हा स्त्रीलिंगी शब्द असल्याने मराठा भाषा असे संबोधले जात नाही, असे प्रतिपादन प्रा. जैमिनी कडू यांनी येथे केले. येथील मराठा सेवा संघप्रणीत जगद्गुरू तुकोबाराय साहित्य परिषदेतर्फे जिल्हा बँकेच्या सभागृहात आयोजित सहाव्या मराठा साहित्य संमेलनाचे उद्घाटन मराठी संत साहित्याच्या अभ्यासक डॉ. गेल ऑमवेट यांच्या हस्ते झाले. त्याप्रसंगी अध्यक्षीय भाषणात प्रा. कडू यांनी मराठा साहित्य, मराठी भाषा अशा विविध मुद्यांना स्पर्श केला. शैला जैमिनी, खा. ए. टी. पाटील, आ. संजय सावकारे, मराठा सेवा संघाचे अॅड. पुरूषोत्तम खेडकर, नेताजी गोरे, सुधीर सावंत, जिजाऊ ब्रिगेडच्या प्रदेशाध्यक्षा स्मिता ढिकले, प्रविण गायकवाड, रामनाथ सोनवणे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
ज्याप्रमाणे गुजराथी, पंजाबी, बंगाली, बिहारी, कानडी, आसामी, चीनी, जर्मनी भाषांचा उल्लेख स्त्रीलिंगी होतो, त्याप्रमाणे मराठा भाषा ऐवजी मराठी भाषा असा उल्लेख करण्यात येतो.
मराठा व मराठी हे शब्द जातवाचक नसून ते भाषा वाचक, प्रांत वाचक असल्याचे प्रा. कडू यांनी सांगितले.
ज्या भौगोलिक प्रदेशात जी भाषा बोलली जाते, त्या भाषेवरूनच भारतात प्रांतरचना झाली. परंतु प्रांतरचना भाषेवरून करताना राजकारण्यांनी मध्यप्रदेश, कर्नाटक, आंध्र प्रदेश आदी राज्यातील अनेक मराठी भाषिक गावे महाराष्ट्राला जोडण्याचा मोठा गुन्हा केला असून त्याची फळे आज आपण भोगत आहोत, असेही त्यांनी स्पष्ट केले.
मराठा साहित्यिकांना डावलण्याचे कारस्थान वर्षांनुवर्षे सुरूच असून सोप्या भाषेत मराठी जनांना जगण्याची व्याख्या सांगणाऱ्या तुकोबांनाही या दिव्यातून जावे लागले, तसेच एकूणच मराठी साहित्यावर ब्राह्मणीकरणाचा प्रभाव दिसून येत आहे, असे मत डॉ. गेल यांनी मांडले. ‘परिवर्तनवादी साहित्य चळवळीचा समन्वय आणि माझी भूमिका’ या विषयावर आयोजित परिसंवादाच्या अध्यक्षस्थानी सत्यशोधक साहित्य परिषदेचे प्रा. डॉ. श्रीराम गुंदेकर हे होते. डॉ. गेल यांनी प्रस्थापितांविरुद्ध तोफ डागली. मराठी संत साहित्यात असलेले ब्राम्हणीकरणावर त्यांनी हल्ला चढविला. तुकोबांना गुरूची गरज नव्हती असे सांगत त्यांनी ‘ईडा पिडा जावो व बळीचे राज्य येवो’ अशी प्रार्थना त्यांनी केली.